गड, निसर्ग आणि पक्ष्यांच्या सोबतीतलं दुर्गभूमी रिसॉर्ट

Written By Parag Kokane on April 01, 2026 | 9:00 AM

वेल्हेच्या सह्याद्री रांगांमध्ये, गुंजवणी धरणालगत, डोंगर उतारावर टेकडीवर वसलेलं दुर्गभूमी रिसॉर्ट पहिल्याच भेटीत मनात घर करून बसते. दुर्गभूमी हे नाव या परिसराला अगदी सार्थ आहे , कारण हा संपूर्ण पट्टा गड-किल्ल्यांच्या इतिहासाने आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. पार्श्वभूमीला उभा असलेला तोरणा, जवळच असलेला राजगड आणि याच विस्तीर्ण सह्याद्री पट्ट्यातले सिंहगड, पुरंदर, लिंगाणा, रायगड, रोहिडा, रायरेश्वर, प्रतापगड, मंगळगड, मकरंदगड, कावळ्या आणि मोहनगड असे अनेक गड या भागाला एक वेगळीच ओळख देतात. समोर पसरलेलं गुंजवणी धरणाचं शांत पाणी आणि पार्श्वभूमीवर दिसणारा तोरणा किल्ला - हे दृश्य विशेषतः संध्याकाळच्या वेळी अप्रतिम दिसतं. सूर्य पाण्यालगतच्या डोंगरांमध्ये हळूहळू मावळत जातो, आकाशाचे रंग बदलत राहतात, पाण्यावर सोनेरी छटा उमटते आणि भोवतालची शांतता मनात खोलवर उतरते.

माझ्यासाठी दुर्गभूमीची खरी ओळख मात्र तिच्या आजूबाजूच्या निसर्गात आणि पक्षीजीवनात दडलेली आहे. इथे शांतपणे थांबून आजूबाजूचे आवाज ऐकायला सुरुवात केली की हा परिसर किती जिवंत आहे याची लगेच जाणीव होते. Indian Scimitar-Babbler (बाकचोच सातभाई) हा या परिसरात दिवसभर आपली उपस्थिती जाणवून देणारा पक्षी आहे. दिवसभर त्याचे लयबद्ध कॉल्स कानावर येत राहतात आणि झुडपांमधून त्याची हालचाल सहज लक्षात येते. Jungle Babbler (रानभाई) इथे चांगल्या संख्येने दिसतात. झुडपं, पायवाटा आणि स्थानिक झाडांनी भरलेले भाग यांमध्ये पक्ष्यांची सतत हालचाल जाणवत राहते.

ह्याशिवाय ,  परिसरात Gray Francolin (राखी तित्तीर), Asian Koel (कोकिळा), White-throated Kingfisher (खंड्या), White-cheeked Barbet (कुर्टुक), Coppersmith Barbet (तांबट), Rose-ringed Parakeet (पोपट), Plum-headed Parakeet (टोई पोपट), Small Minivet (निखारा), Orange Minivet (केशरी निखारा), Common Iora (सुभग), Common Tailorbird (शिंपी), Red-whiskered Bulbul (शिपाई बुलबुल), Red-vented Bulbul (लालबुड्या बुलबुल), Indian Robin (चीरक), Oriental Magpie-Robin (दयाळ), Pied Bushchat (कवडा गप्पीदास), Purple-rumped Sunbird (जांभळ्या पाठीचा शिंजीर) आणि Purple Sunbird (जांभळा शिंजीर), Blue Rock Thrush (निळा कस्तूर) असे अनेक पक्षी दिसू शकतात. यातील काही पक्षी त्यांच्या आवाजामुळे आधी लक्षात येतात, तर काही त्यांच्या रंगांमुळे आणि हालचालींमुळे नजरेत भरतात. विशेषतः Small Minivet, Orange Minivet हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर सुंदर उठून दिसतात. Common Iora आणि Tailorbird झुडपांमध्ये सतत हालचाल करताना दिसतात, तर Sunbirds फुलांभोवती फिरताना दिसतात.

आकाशात नजर टाकली की काही शिकारी पक्ष्यांची उपस्थितीही जाणवते. Black-shouldered Kite (कापशी घार) हा पक्षी त्याच्या खास शैलीमुळे लगेच लक्ष वेधून घेतो. हवेत एकाच जागी स्थिर राहून तो खालील माळरानावर नजर ठेवतो. कधी एखादा Shikra (शिक्रा) झपाट्याने उडताना दिसतो, तर कधी दूरवर काही eagles (गरुडवर्गीय शिकारी पक्षी) उंच भराऱ्या घेताना नजरेत भरतात. या पक्ष्यांच्या भराऱ्या पाहताना इथल्या मोकळ्या आकाशाची, डोंगराळ भूभागाची आणि सह्याद्रीच्या रानटी सौंदर्याची खरी मजा जाणवते.

दुर्गभूमी परिसरात विशेष आकर्षण म्हणजे इथले swallows आणि swifts. Wire-tailed Swallow (तारवाली पाकोळी) इथे अनेकदा दिसतात. त्यांच्यासोबत Eastern Red-rumped Swallow (लालबुडी भिंगरी) तसेच इतर पाकोळ्या सतत हवेत फिरताना दिसतात. रिसॉर्टच्या इमारतींवर, छपराखाली किंवा सुरक्षित कोपऱ्यांमध्ये त्यांच्या घरट्यांची रांग दिसते. त्यांची सततची ये-जा, हवेतले वेगवान वळसे आणि अचूक उडण्याची शैली पाहत बसणं हा स्वतःमध्ये एक सुंदर अनुभव आहे.

दिवस मावळतीकडे झुकला की वातावरणात वेगळीच लय तयार होते. Grey Junglefowl (रानकोंबडा) चा आवाज संध्याकाळी ऐकू यायला लागतो. तो रात्री उशिरापर्यंत, काही वेळा मध्यरात्रीपर्यंतही कानावर पडतो आणि पुन्हा पहाटेच्या सुमारास त्याच आवाजाने दिवसाची चाहूल लागते. रात्रीच्या शांततेत इथलं पक्षीजीवन अजून वेगळ्या रूपात ऐकू येतं. इथे Indian Nightjar, Jungle Nightjar आणि Savanna Nightjar अशा तीनही nightjar (रातवा) प्रजातींचे कॉल्स ऐकायला मिळाले आहेत.

समोरच्या गुंजवणी बॅकवॉटरमध्येही पक्ष्यांची वेगळी दुनिया दिसते. पाण्यावर उडणारे River Tern (नदी सुरय) विशेष लक्ष वेधून घेतात. पाण्याच्या काठावर आणि शांत भागात इतर पाणथळ पक्षीही अधूनमधून दिसतात. त्यामुळे दुर्गभूमीचा परिसर केवळ डोंगराळ पक्ष्यांसाठीच नाही, तर बॅकवॉटरमुळे जलपक्ष्यांसाठीही आकर्षक ठरतो.

इथली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसॉर्टमध्ये केलेली झाडांची लागवड. बाहेरून आणलेल्या फक्त सजावटी झाडांपेक्षा स्थानिक झाडांना प्राधान्य दिलं गेलं आहे, त्यामुळे परिसर कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटतो. अशा झाडांमुळे पक्ष्यांना निवारा, अन्न आणि योग्य अधिवास मिळतो. याचमुळे परिसरात फुलपाखरांची उपस्थितीही जाणवते. या भागात Common Mormon, Blue Mormon, Common Rose, Common Jezebel, Plain Tiger, Common Crow, Danaid Eggfly, Lemon Pansy, Peacock Pansy, Yellow Orange-tip, Grass Yellow आणि Common Emigrant अशी फुलपाखरं पाहण्याची संधी मिळू शकते.

वेल्हे ते मढेघाट हा संपूर्ण पट्टा निसर्ग अभ्यासासाठी खूप समृद्ध आहे. या भागात अनेक वर्षं फिरताना पक्ष्यांबरोबरच सरडे, साप, बेडूक आणि इतर लहान वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनुभव वेगळाच असतो. सह्याद्रीच्या ओलसर दऱ्या, दगडी कडे, झाडाझुडपांचे पट्टे, पाणवठे आणि रानवाटा यामुळे herpetology साठी हा भाग नेहमीच आकर्षक राहिला आहे. या पट्ट्यात Green Vine Snake (हरणटोळ), Common Bronzeback (ब्रॉन्झबॅक वृक्षसर्प), Checkered Keelback (दिवड), Rat Snake (धामण), Spectacled Cobra (नाग), तसेच काही भागांत Bamboo Pit Viper (हिरवा चापडा) सारख्या सापांची नोंद घेण्यासारखी शक्यता असते. बेडकांमध्येही पावसाळ्यात वेगवेगळ्या कॉल्समुळे परिसर जिवंत होतो — Indian Bullfrog, Skittering Frog, Cricket Frog, Night Frogs, Tree Frogs आणि Bush Frogs अशा प्रकारचे बेडूक या सह्याद्री पट्ट्यात पाहणं आणि ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. दुर्गभूमीमध्ये अजून माझी पावसाळ्यात भेट झालेली नाही, त्यामुळे तिथल्या पावसाळी वन्यजीवनाबद्दल नोंदी करायच्या आहेत; पण या परिसराची भौगोलिक रचना पाहता पावसाळ्यात रिसॉर्ट परिसरात बेडूक, साप आणि इतर लहान जीव शोधणं नक्कीच खूप रंजक ठरेल. पावसाळ्यात परिसरात असलेला नैसर्गिक धबधबा हे आणखी एक आकर्षण ठरू शकतं. डोंगर उतारावर असलेला हा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह, आजूबाजूची दाट हिरवाई आणि सह्याद्रीची पार्श्वभूमी — हे सगळं मिळून दुर्गभूमीचा पावसाळ्यातला अनुभव नक्कीच खूप काही वेगळा असेल असं वाटतं. विशेषतः निसर्ग निरीक्षणाची आवड असेल, तर पक्षी, फुलपाखरं, बेडूक, साप आणि इतर लहान जीव यांची नोंद घेण्यासाठी हा ऋतू पुढच्या भेटीत नक्कीच महत्त्वाचा ठरेल.

SHARE

About Parag Kokane

With my camera and binoculars, I wander through the beautiful landscapes of the Western Ghats, capturing the amazing wildlife and nature around us. On this blog, you'll find exciting wildlife observations, my thoughts on protecting nature, and more. Join me as we explore and help protect the beauty of our world together.

0 comments :

Post a Comment